लातूर : गोवा बनावटीच्या दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून 3 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई औसा तालुक्यातील एरंडी ते सारोळा रोडवर गुरुवारी करण्यात आली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील एरंडी ते सारोळा या मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवा राज्यात निर्मिती झालेल्या दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या आदेशानुसार विषेश पथकाने पांढऱ्या रंगाच्या कारचा (एम.एच.12 ए. एक्स. 8113) पाठलाग करत दारू साठ्यासह एकाला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता, शरद रामराव पवार (वय 33, रा. उदगीर जि. लातूर) असे त्याने नाव सांगितले. दरम्यान, करसह दारु साठा असा एकूण 3 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यय निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, अमोल जाधव, स्वप्नील काळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे, ए.के. शिंदे यांच्या पथकाने केली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.