लातूर : मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यंदा ते होऊ नये म्हणून सुप्त अवस्था संपून जमिनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यांनी अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान टाळता येईल, असा सल्ला कृषी अभ्यासकांनी दिला आहे.
जमिनीतील सुप्त अवस्था संपून वर आलेल्या गोगलगायी पंधरा दिवसांत समान आकाराच्या गोगलगायींशी संग करून पंधरा दिवसांनंतर जमिनीच्या खाली प्रत्येक गोगलगाय १०० ते १५० अंडी टाकतात. या अंड्याद्वारे गोगलगायींचे पुढील वर्षाची पिढी तयार होते. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायींचे नियंत्रण केले तर चालू हंगामातील सोयाबीन पिकाबरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल.
गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन...गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेत मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सध्या गोगलगायी सुप्त अवस्थेतून बाहेर आलेल्या आहेत. दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बांधाच्या बाजूने आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरूपात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतात जाऊन जमिनीच्या वर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठे न टाकून देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत. गोळा केलेल्या गोगलगायीवर मीठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. त्यासोबतच सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजूने रँडम पद्धतीने टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदान या खाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास गोळ्याचे पावडर तयार करून पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करावी. पेस्ट मुरमुऱ्याला लावावी. मुरमुरे गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर टाकावेत. गोळा करताना हातात हातमोजे घालणे आवश्यक आवश्यक. या पद्धतीने गोगलगाय नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.