लातूर : शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ६८ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाकडून ९३ कोटी रुपये मदत मंजूर झाली आहे. १ लाख ५ हजार ६३६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत लवकरच वर्ग होणार आहे. या मदतीचा अध्यादेश शासनाने बुधवारी काढले आहेत.
जुलै महिन्याच्या प्रारंभापासून लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांवर वेगवेगळे रोग पसरले गेले. यलो मॅझिकसह शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव पिकांवर झाला. जिल्ह्यातील ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिके शंखी गोगलगायीने फस्त केले होते. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या शेतातील खरीपाचे पिक शंखी गोगलगायीने फस्त केले.२ हेक्टरपुढील ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६४.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याला शासनाने नुकसान भरपाई म्हणून ४० कोटी ६३ लाख ९७ हजार रुपये मंजूर केले आहेत. तर २ ते ३ हेक्टरपर्यंत १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८ हजार ६२०.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने ११ कोटी ७२ लाख ४२ हजार रुपये मंजूर केले आहेत.२ हेक्टरपर्यंत आणि ३ हेक्टरपर्यंत मिळून १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
प्रतिहेक्टर अशी मिळणार मदत...लातूर जिल्ह्यामध्ये जिरायत पिकाचे नुकसान झालेले आहे. बागायत किंवा बहूवार्षिक पिकाच्या नुकसानीचे क्षेत्र जिल्ह्यात निरंक आहे. त्यामुळे जिरायत (खरीप) पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये शासनाकडून जाहीर झाले असून, त्याची मदतही मंजूर झाली आहे. ३ हेक्टर पर्यतच्या नुकसानीसाठी मदत मंजूर झाली आहे. या सुत्रानुसार जिल्ह्याला ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहे, असे १४ सप्टेेंबर रोजी निघालेल्या अध्यादेशात म्हंटले आहे.