लातूर : सात लाखांची लाच स्वीकारताना येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवानंद कृष्णाजी मिनगिरे (३५) यांच्यासह संस्थाचालक उमाकांत नरसिंग तपशाळे (५२, रा. शेल्हाळ रोड, उदगीर) या दोघांना मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सूत्रांनी सांगितले, उदगीर येथील एका अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांचे एकूण ४७ लाख ३३ हजार ६८९ रुपयांचे वेतनाचे बील थकले होते. हे थकीत बील काढलेल्या कामाचे बक्षिस म्हणून बिलाच्या २० टक्के प्रमाणे ९ लाख ४० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती सात लाख देण्याचे ठरले होते.
यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकाने लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाठिमागील एका हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. यावेळी उदगीर येथील अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थासचिव उमाकांत नरसिंग तपशाळे याने जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवानंद कृष्णाजी मिनगीरे यांच्या समक्ष सात लाखांची लाच स्वीकारली. यावेळी दोघांनाही लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सात लाखांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याचे एसीबीचे उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांनी सांगितले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.