लातूर : सोलापूर-लातूर-लोकमान्य टिळक टर्मिनन्स (कुर्ला ) या साप्ताहिक विशेष रेल्वेला आता भालकी, उदगीर आणि लातूररोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रारंभी भालकी आणि उदगीर स्थानकावर थांबा देण्यात आला नव्हता. परिणामी, उदगीर, जळकोट तालुक्यातील प्रवाशांना या विशेष रेल्वेगाडीने प्रवास करणे शक्य नव्हते. मतदारसंघातील प्रवाशांची हाेणारी गैरसाेय दूर करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे उदगीरला थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता या रेल्वेला भालकी आणि उदगीर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. असे रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिली.
गत आठवड्यात नवीन तीन साप्ताहिक विशेष रेल्वेची प्रायाेगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. सोलापूर-लातूर-तिरूपती, सोलापूर-लातूर-लोकमान्य टिळक टर्मिनन्स (कुर्ला), पुणे-लातूर-अमरावती या तीन रेल्वेगाड्या खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांतून सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी सोलापूर-लातूर-लोकमान्य टिळक टर्मिनन्स (कुर्ला) या विशेष रेल्वेगाडीला भालकी आणि उदगीर येथील स्थानकावर थांबा देण्यात आला नव्हता.
परिणामी, उदगीर-जळकोट तालुक्यातील प्रवाशांना या रेल्वेचा काहीच फायदा होणार नव्हता. उदगीर परिसरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी उदगीरला थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता रेल्वे विभागाने आदेश जारी केले असून, भालकी, उदगीरला थांबा देण्यात येत असल्याचे कळविले आहे. लातूर रोडला यापूर्वीच थांबा देण्यात आलेला होता. ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १३ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. या रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे.