लातूर: जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्यात येत असून यंदा ६ लाख ४१ हजार २५० हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा तर ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होण्याची शक्यता आहे.
सोयाबीनच्या पेरणीसाठी तीन लाख ६७ हजार बियाणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांकडे पाच लाख १९ हजार ६०० क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. बियाणे बदलासाठी आवश्यक एक लाख २८ हजार ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित पिकांचेही बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत दिली. एक लाख १२ हजार मॅट्रिक टन खत मंजूर.... गतवर्षी खरीप हंगामात एक लाख पाच हजार पाचशे पंच्याहत्तर मॅट्रिक टन खताचा वापर झाला होता.
खरीप हंगामामध्ये सरासरी ९० हजार ५८१ मॅट्रिक टन खताचा वापर होतो. यावर्षीही एक लाख १२ हजार २६० मॅट्रिक टन खत मंजूर झालेला आहेः महिनानिहाय त्याचे वितरण केले जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन.... ननो युरिया प्रमाणे न्यानो डीएपी खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बोगस बियाणे खतांची विक्री रोखण्यासाठी गुण नियंत्रण पथकामार्फत आवश्यक कारवाई केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच राज्यस्तरावर टोल फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.