- एम. जी. मोमीन
जळकोट (जि़ लातूर) : तालुक्यात सोयाबीन पाण्यात असून, हायब्रीडच्या कणसाला मोड फुटले आहेत, तर काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीतून धुराडा निघत आहे.
तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील सोयाबीन, २ हजार हेक्टरवरील खरीप ज्वारी व ११ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक पाण्यात गेले आहे. एकंदर तालुक्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. माळहिप्परगा शिवारात एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. माळहिप्परग्याचे शेतकरी रामचंद्र केंद्रे सांगत होते, १० एकरपैकी ६ एकरवर सोयाबीन पेरले ते पाण्यात बुडाले आहे. तुकाराम केंद्रे यांच्या शेतातील सोयाबीनही पाण्यात आहे. मंगरुळच्या ७३० एकरच्या शिवारातही पाणी असून महेताब बेग यांच्या कापसाच्या पिकाचे बोंड पाण्यात गळून पडले. उद्धव सूर्यवंशी, सोनवळ्याचे विठ्ठल रामकिशन पाटील यांचीही पिके नष्ट झाली आहेत.
थेट मदतीची मागणीहावरगा येथील विनोद कांबळे, शिवाजीनगर तांडा येथील धोंडिराम राठोड, जळकोटचे सुभाष भोसले, सोनवळ्याचे अरविंद नागरगोजे, सेलदरा येथील बापूराव पाटील, वैजनाथ कमलापुरे आदी शेतकऱ्यांनी बाधित पीक दाखवून थेट मदत करण्याची मागणी केली. अशीच विदारक स्थिती कोळनूर, बोरगाव, शेलदरा, रावणकोळा, घोणसी, जळकोट, माळहिप्परगा आदी शिवारातील पिकांची आहे़