लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : काही दिवसांपासून वायदे बाजारात सोयाबीनच्या दराने विक्रमी वाटचाल केली आहे. दरम्यान, बाजारपेठेत तुरळक आवक होत असल्याने सोयाबीनला उच्चांकी भाव मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी वायदे बाजार बंद होताना ५७१ रुपयांची वाढ होत १० हजार ८९ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे सोयाबीनला कमाल भाव ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. किमान तीन दिवस तरी सोयाबीनचे दर चढेच राहणार आहेत.
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा देशातील बाजारपेठेवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची निर्माण झालेली कमतरता, देशांतर्गत झालेले कमी उत्पादन, खाद्यतेलासाठी असलेली मागणी या सर्व बाबींचा परिणाम होऊन सोयाबीनच्या दरात वाढ होत आतापर्यंतचा ऐतिहासिक दर मिळत आहे. व्यापाऱ्यांकडील साठा संपुष्टात आला असून, बाजारात तुरळक आवक होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, त्यांना या दराचा लाभ होत आहे.
गेल्यावर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यावेळी परतीचा जोरदार पाऊस झाल्याने या भागातील सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात डागी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. शेतमालात ओलावा व डागीच्या प्रमाणामुळे सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांच्या जवळपास भाव मिळाला होता. त्यानंतर हळूहळू सोयाबीनचे दर वाढून ४ हजारांच्या जवळपास स्थिरावले होते. गत हंगामासाठी शासनाने ३ हजार ८८० रुपये असा भाव जाहीर केला होता. दरम्यान, जानेवारीपासून मार्चपर्यंत दर ४ हजार ५०० रुपयांच्या जवळपास स्थिर होता. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सोयाबीनच्या पेंडीला व खाद्यतेलाला मागणी वाढत असल्याने त्याचा परिणाम दर वाढण्यावर झाला आहे.
वायदे बाजारात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ५७१ रुपयांनी वाढ होऊन दर पुन्हा १० हजारांच्या पुढे गेल्याने नवीन सोयाबीनची आवक होईपर्यंत सोयाबीनच्या दरात असाच चढ-उतार पाहण्यास मिळणार आहे.
काही दिवस दर कमी होण्याची शक्यता कमी...
आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सोयाबीनच्या पेंडीला व तेलाला मागणी असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढत आहेत. व्यापाऱ्यांजवळील साेयाबीन संपले आहे. तुरळक शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतमालाला आता चांगले दिवस आले आहेत. नवीन हंगाम येण्यासाठी आणखी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक आहे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यातील तफावत पाहता आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
- सागर महाजन, सोयाबीन कारखानदार.
६८५ पोत्यांची आवक...
शुक्रवारी बाजारात केवळ ६८५ पोत्यांची आवक झाली होती. चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल तर किमान ९ हजार ४०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण भाव ९ हजार ६०० रुपये मिळाला असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.