लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक सध्याला स्थिर असून, प्रतिक्विंटलचा दर मात्र ५,५०० ते ५,६०० रुपयांवर अडला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतिक्षेत घरातच ठेवलेले साेयाबीन आता घरातच पडून आहे. यातून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला जवळपास २०० ते ३०० रुपयांचा फटका बसला आहे.
गत तीन महिन्यात सर्वाधिक दर २१ नाेव्हेंबर राेजी पाच हजार ८०० रुपये मिळाला हाेता. दरम्यान, पुन्हा दरामध्ये घसरण झाली असून, शनिवार हाच दर पाच हजार ६३० रुपयांवर हाेता. लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, औराद आणि मुरूड येथील आडत बाजारात साेयाबीनसह इतर शेतमालांची आवक जेमतेम आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेवर आपला शेतीमाल घरातच दडवून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी पाच हजार ८०० रुपयांचा भाव मिळाल्यानंतर विक्री केला आहे.
शेतकऱ्यांचा अंदाज चुकला...साेयाबीनचा दर सहा हजारांवर ओलांडेल, असा अंदाज काही शेतकऱ्यांना हाेता. मात्र, त्यांचा अंदाज चुकीचा ठरला आहे. यात गत तीन महिन्यात घसरण झाली. गेल्या आठ दिवसांत दरात चढउतार हाेत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आता साेयाबीन विक्रीसाठी बाजारात आणावे किंवा नाही याचा अंदाज लागत नाही.
दर घसरत असल्याने नुकसान...दिवसेंदिवस दर घसरले तर पुन्हा प्रतिक्विंटलच्या नुकसानीत वाढ हाेईल. असेही काही शेतकऱ्यांना वाटत आहे. किमान सहा हजार रुपयांचा दर मिळेल, असा अंदाज हाेता. बाजारातील आवकही मंदावली असून, दरातही कासवगतीने चढ- उतार आहे.
सप्टेंबरमध्ये पाच हजारांचा दर...सप्टेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत साेयाबीनच्या दरात चढ- उतार झाले आहेत. सध्याला दर स्थिर असला तरी ता ५,५०० ते ५,६०० रुपयांच्या घरातच अडकला आहे. सप्टेंबरमध्ये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार हाेता. ऑक्टाेबरमध्ये ताेच दर पाच हजार १०० रुपयांवर पाेहाेचला. तर नाेव्हेंबर महिन्यात यामध्ये वाढ झाली आणि सर्वसाधारण दर पाच हजार ७८१ रुपयांवर पाेहाेचला हाेता.