लातूर : आवक घटल्याने सोयाबीनला गेल्या काही दिवसांपासून विक्रमी दर मिळत आहे. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ३ हजार १७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण दर ९ हजार ७६० रुपये तर कमाल दर ९,८५१ आणि किमान दर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. हमीभावापेक्षा कितीतरी पटीने हा दर जास्त आहे. परंतु, सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा नाही. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्यामुळे दर वाढलेला आहे. ज्यांनी सोयाबीन विक्री न करता ठेवले त्यांना याचा फायदा होत आहे. सध्या लातूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात हरभऱ्याची आवक २ हजार ६०९ क्विंटल असून, हरभऱ्याला कमाल दर ५ हजार ३०० रुपये, किमान ४ हजार ४०२ रुपये आणि सर्वसाधारण ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. बाजारात तुरीची आवक २ हजार २५२ क्विंटल असून, कमाल दर ६ हजार ६०० रुपये, किमान दर ६ हजार १ रुपये आणि सर्वसाधारण दर ६ हजार ४३० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. मुगाची आवक १०४ क्विंटल असून, कमाल दर ६ हजार रुपये, किमान दर ५ हजार ८०० रुपये तर सर्वसाधारण दर ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल आहे.
शेतमालाची अशी आहे आवक...
मार्केट यार्डात गूळ ३१८, गहू १ हजार ३२६, हायब्रीड ज्वारी २५, ज्वारी रब्बी ५५५, ज्वारी पिवळी १६, हरभरा २ हजार ६०९, तूर २ हजार २५२, मूग १०४, एरंडी १४, करडी १५८, सोयाबीन ३ हजार १७१ आणि चिंचोक्याची ३२ क्विंटलची आवक शुक्रवारी बाजार समितीत होती.
तूर, मूग, हरभरा आणि सोयाबीन या पिकाला शासनाकडून हमीभाव जाहीर झाला होता. या तिन्ही पिकांना मागच्या हंगामात हमीभावापेक्षा अधिक भाव मार्केट यार्डात मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राऐवजी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीला पसंती दिली आहे.