लातूर : सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. गतवर्षी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त होते. तर यंदा पान खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. त्यातच पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे. यामुळे सोयाबीन पिवळे पडत असून, अळ्या पिके फस्त करीत आहेत.
महाराष्ट्रात लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोय. एकूण खरीप क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात आहे. पाच लाख हेक्टरवर यंदा सोयाबीनची पेरणी झालेली आहे. वेळेत पाऊस पडल्यामुळे आणि वेळेत पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन बहरले आहे. पण त्यावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फवारणी करावी तर पावसाची रिपरिप आहे. पूर्ण मशागत होत नाही. त्यामुळे अळ्यांचा नायनाट होत नाही, अशा अडचणीत सोयाबीनचे पीक आले आहे.
पेरणीनंतर पावसाची रिपरिप सुरूचपेरणीनंतर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. पिकांची वाढ चांगली झाली. सतत रिमझिम पाऊस पाऊस होत असल्याने काही ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४७० मिमी पाऊस झाला आहे. अनेक शेतात सध्या वापस नाही. त्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. परिणामी, फवारणी करता येत नसल्यामुळे हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हिरव्या अळ्या यंदा सोयाबीन पिकावर परिणाम करतील, असे शेतकरी बोलत आहेत.
कीटकनाशकाचा पुरवठा करणे आवश्यककृषी विभागाने गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मेटाल्डीहाईट कीटकनाशक पुरवठा केला होता. तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपी दिले होते. आता अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
फवारणी पंप देण्याची घोषणा हवेतचपिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना फवारणी पंप देण्यासाठी घोषणा केली होती. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. काही जणांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. फवारणी पंप देण्याची योजना हवेतच विरली आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पंप देण्याची आवश्यकता होती. अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता या पंपाची मदत झाली असती.