लातूर : भरधाव ट्रकने समोरून आयशर टेम्पोला जोराची धडक दिल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपा गावानजीक रात्री उशिरा घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील भातांगळी येथील खयमाेद्दीन ऊर्फ खय्युम सत्तारसाहब सय्यद (वय ३०) हे आयशर टेम्पाे (एम.एच. २४ ए.यू. ३३५७) घेऊन लातूरकडून भातांगळी गावाकडे गुरुवारी रात्री उशिरा निघाले हाेते. दरम्यान, काेळपा पाटीनजीक आल्यानंतर एका वाहनाच्या शाेरूमसमाेर नांदेडकडून लातूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रकने (एम.एच. २६ बी.ई. ७२७२) टेम्पाेला समाेरून जाेराची धडक दिली. या अपघातात टेम्पाेचालक खय्युम सय्यद हा गंभीर जखमी झाला. त्याच्या दाेन्ही पायाला, छातीला, ताेंडाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालकाने आपले वाहन जागेवरच साेडून धूम ठाेकली. या अपघाताची माहिती विवेकानंद चाैक पाेलिसांना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत गंभीर जखमी झालेल्या टेम्पाे चालकाला एका वाहनातून लातूरच्या शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना टेम्पाे चालकाचा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली. याबाबत ताजाेद्दीन सत्तारसाहब सय्यद (वय ३८) यांनी दिलेल्या व तक्रारीवरून विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करत आहेत.
टेम्पाेचा चेंदामेंदा; चालकही अडकला...लातूर येथून भातांगळी गावाकडे जात असलेल्या टेम्पाेस लातूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने समाेरून जाेराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण हाेता की टेम्पाेचा पार चेंदामेंदा झाला आहे. टेम्पाेचे केबिन पूर्णत: दबल्याने त्यात टेम्पाे चालक अडकला. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्रा कापून जखमी टेम्पाे चालकाला बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुसाट ट्रकने घेतला टेम्पाे चालकाचा बळी...टेम्पाे चालक खय्युम सय्यद आपल्या दिशेने जात हाेताे. मात्र, सुसाट आलेला ट्रक टेम्पाेवर समाेरून जाेराने आदळला. या अपघातात टेम्पाेचे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे. काही कळायच्या आतच भरधाव ट्रकने टेम्पाेचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. या अपघाताने टेम्पाे चालकाचा बळी घेतला आहे. हयगय व निष्काळजीपणा चालकाच्या जिवावर बेतला आहे.