- महेश पाळणेलातूर : गुणवत्ता व कौशल्य असलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंना आता क्रीडा क्षेत्रात उभारी घेण्यासाठी घाबरायची गरज नाही. कारण या खेळाडूंच्या पाठीशी आता क्रीडा विभाग व महसूल विभागातील अधिकारी राहणार आहेत. भविष्यात त्यांना मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्व:ताच्या खिशातून व प्रायोजकाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. त्यामुळे गरीब, होतकरु खेळाडूंची आता अडथळ्यांची शर्यत दूर हाेणार आहे.
अनेक वेळा होतकरु खेळाडूंना आर्थिक अडचणीअभावी क्रीडा सरावासाठी व स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची संधी अनेकवेळा हूकते. ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभाग व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना मासिक वर्गणी व प्रायोजकाच्या माध्यमातून मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता विविध खेळांचे क्लब व अन्य खेळाडूंच्या प्रशिक्षकांकडून गरिब व होतकरु खेळाडूंची माहिती मागविण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्या गरजेअनुरुप त्यांना मदत मिळणार आहे. एकंदरीत अधिकाऱ्यांच्या या नव्या संकल्पनेमुळे उद्योन्मुख खेळाडूंच्या सरावाला बळ मिळणार आहे.
क्रीडा साहित्य, स्पर्धेसाठी मदत...खेळांच्या अनुरुप क्रीडा साहित्यासाठी तसेच प्रशिक्षण शिबिर, क्रीडा स्पर्धा सहभागासह अनेक बाबींसाठी ही आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी जिल्हा व विभागस्तरावरील विजेत्या, उपविजेत्या तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग आवश्यक राहणार आहे.
स्पर्धेतील कामगिरीवर खेळाडूंचे भवितव्य...जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी पात्र असलेल्या खेळाडूंची कामगिरी जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावी. जेणेकरुन या उपक्रमासाठी समितीस सहकार्य होईल. ही समिती गरजू खेळाडूंना या माध्यमातून मदत करेल.
उपजिल्हाधिकारी व डीएसओंची संकल्पना...उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक व डीएसओ जगन्नाथ लकडे यांनी उद्योन्मुख गरीब खेळाडूंना न्याय देण्यासाठी ही योजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे. प्रत्येक महिन्याला अधिकाऱ्यांच्या मासिक वर्गणीतून व प्रायोजकामार्फत खेळाडूंवर होणार हा खर्च केला जाणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.