निलंगा/ केळगाव : निलंगा तालुक्यातील झरी येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर शेतात तणनाशकाची फवारणी केली. मात्र, तणनाशकाबरोबर सोयाबीनचे पीकही जळून गेल्याची घटना घडली आहे. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पंचनामा केला.
झरी येथील शेतकरी प्रताप रामचंद्र पाटील यांची सर्वे क्र. ११५ मध्ये चार एकर शेती आहे. त्यांनी खरीप सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतात तण वाढले आहे. त्यामुळे त्यांनी केळगाव येथील कृषी सेवा केंद्रावरुन तणनाशकाच्या औषधाची खरेदी केली. ते औषध त्यांनी पाण्यात मिसळून चार एकर शेतात फवारले. तेव्हा गवताबराेबर संपूर्ण सोयाबीन जळून गेले. त्यामुळे पाटील हे हतबल झाले.
दरम्यान, कृषी विभागाने पाहणी करुन पंचनामा करावा. तसेच शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी ए.पी. शेळके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. एन. कुटवाड, कृषी सहाय्यक एस. आर. लासुने यांनी बुधवारी पाहणी करून पंचनामा केला. बोगस औषधामुळे पीक जळून गेल्याचे शेतकऱ्याचा मुलगा रोहन पाटील यांनी सांगितले.