लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २ मार्चपासून दहावीच्यापरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला लातूर विभागीय मंडळातील १ हजार ८९३ शाळांमधील १ लाख ५ हजार ६३१ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. यासाठी ३९५ केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, जिल्हास्तरावर भरारी पथकांचेही नियोजन करण्यात आले आहे.
लातूर विभागीय मंडळामध्ये लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातून १६० केंद्रावर ४५ हजार ५१९, उस्मानाबाद ८६ परीक्षा केंद्रांवर २१ हजार ९५७ आणि लातूर जिल्ह्यातील १४९ केंद्रावर ३८ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. तीनही जिल्ह्यात ५१ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये नांदेड २०, उस्मानाबाद ११ आणि लातूर जिल्ह्यातील २० केंद्रांचा समावेश असल्याचे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी...लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यामधील ३९५ केंद्रावर गुरुवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी जिल्हास्तरावर दक्षता समिती असून, भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.