- भालचंद्र येडवे
लातूर : बालपणीच बाबा गेले. दहावी निकालाच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने आईनेही जग सोडले. आपली मुलगी गुणवान आहे, ती मोठी होऊन दोन्ही बहिणींना पुढे नेईल, असा दृढ विश्वास असणारी आई आपल्या रेणुकाचे कौतुक करायला या जगात नाही.
रेणुका दिलीप गुंडरे बुधवारी दहावी परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. काही वर्षांपूर्वी रेणुकाच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर एकर-दीड एकर कोरडवाहू शेतीवर तीन लहान मुलींचा सांभाळ करीत अनिता गुंडरे यांनी सदैव शिक्षणाला महत्त्व दिले. तिघींमध्ये सर्वात मोठी रेणुका हुशार. तिने जळकोट तालुक्यातील होकर्णा या मूळगावी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे जवळच असलेल्या वांजरवाडा येथील श्री संत गोविंद स्मारक विद्यालयात पुढचे शिक्षण पायी जाऊन पूर्ण केले. रेणुकाला जितकी निकालाची उत्सुकता होती, त्याहून अधिक आई अनिता गुंडरे यांना होती. मात्र, निकालाच्या एक दिवस आधी रेणुकाच्या आईला सर्पदंश झाला आणि यात त्यांचे निधन झाले.
मदतीचा हात...वडील गेले. आई गेली. दोन लहान बहिणींना घेऊन रेणुका पुढचे शिक्षण कसे पूर्ण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ९३.२० टक्के गुण मिळविणाऱ्या या गुणवान मुलीचे शिक्षण कसे होणार, परिवाराचा उदरनिर्वाह कोण करणार, हा विचार करून प्रत्येकाचेच हृदय पिळवटून निघत आहे.