लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर पॅटर्नचा दबदबा कायम आहे. राज्यातील २४२ पैकी एकट्या लातूर बोर्डाच्या १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले आहेत. तर लातूर विभागीय मंडळाचा ९३.९ टक्के निकाल लागला आहे.
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून १ लाख ९ हजार ९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७ हजार ७७३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. पैकी १ लाख ३ हजार २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी बुधवारी दिली.
नांदेड जिल्ह्यातील ४५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ८३८ विशेष प्राविण्यात, १३ हजार १२८ प्रथम श्रेणीत तर १२ हजार २६२ द्वितीय श्रेणीत असे एकूण ४० हजार ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची टक्केवारी ८९.५३ इतकी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २१ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ७ हजार ९६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ७ हजार ५२ प्रथम श्रेणीत तर ४ हजार ५२७ द्वितीय श्रेणीत असे एकूण २० हजार ७०४ उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९४.२५ आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यातील ४० हजार ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १६ हजार ९९० विशेष प्राविण्यात, १२ हजार ८८० प्रथम श्रेणीत तर ७ हजार १५५ द्वितीय श्रेणीत असे एकूण ३८ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९६.५१ एवढी आहे. दरम्यान, लातूर विभागीय मंडळात निकालाच्या बाबतीत लातूर जिल्हा अव्वलस्थानी राहिला असून, त्यापाठोपाठ उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
लातूर जिल्ह्यातील १२९ विद्यार्थ्यांना १०० टक्के...लातूर बोर्डा अंतर्गत नांदेड, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. यंदाच्या निकालात नांदेड जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील १९ तर लातूर जिल्ह्यातील १२९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. गेल्या तीन वर्षांतील निकालाचा आढावा घेतला तर लातूर बोर्डाने सातत्याने बाजी मारली आहे. २०१७ मध्ये लातूर बोर्डाचे सर्वाधिक ४५ विद्यार्थी १०० टक्क्यांवर होते. २०१८ मध्ये ७० तर २०१९ मध्ये १६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले होते.