लातूर : दहावी परीक्षेत पुन्हा एकदा लातूर विभागाचा दबदबा कायम असून, राज्यातील १०० टक्के गुण मिळविलेल्या १५१ विद्यार्थ्यांपैकी एकट्या लातूर विभागातील १०८ विद्यार्थी आहेत.
लातूर विभागात नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचा समावेश असून, एकूण विभागाचा निकाल ९२.६७ टक्के तर जिल्हानिहाय नांदेड ९०.३९ टक्के, धाराशिव ९३.५० टक्के तर लातूर जिल्ह्याचा ९४.८८ टक्के निकाल लागला आहे. विभागातील एकूण १८०९ शाळांपैकी ३८३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
लातूर विभागातून १ लाख ४ हजार ५८२ विद्यार्थ्यांना नोंदणी केली होती. पैकी १ लाख २ हजार ८८२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. यातील ९५ हजार ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील ४४ हजार १०९ पैकी ३९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९०.३९ टक्के आहे. धाराशिव जिल्ह्यातून २१ हजार ४०४ विद्यार्थी सामोरे गेले. पैकी २० हजार १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९३.५० टक्के असा आहे. त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यातून ३७ हजार ३६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३५ हजार ४५८ उत्तीर्ण झाले. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल ९४.८८ टक्के लागला असून, यंदाही लातूर जिल्हा अव्वल स्थानावर राहीला आहे.