लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कोरोनानंतर सुसाट धावू लागली असून, वेगवेगळ्या योजनांमुळे एसटीला बळ आले आहे. महिला सन्मान योजना असो की, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली अमृत योजना असो, यामुळे एसटीला चांगले वैभव निर्माण झाले आहे. गेल्या मे महिन्यात लातूरच्या एसटीला २ कोटी ८२ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. जिल्ह्यातील पाच आगारांपैकी लातूर आगाराने सर्वाधिक १ कोटी ५९ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नेहमीच तोट्यामुळे चर्चेत असायची. आता मात्र तोट्यातून नफ्यात बस आली आहे. यामुळे प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळत आहे. वातानुकूलित बसेस तसेच थांबे व ठिकाणे आणि धावती स्थिती काय आहे, याबाबतची इत्यंभूत माहिती आधुनिक तंत्राद्वारे मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय प्रवासी जो की खासगी वाहतुकीकडे वळला होता. तो आता महामंडळाच्या बसेसकडे वळला आहे. त्यामुळेच गेल्या मे महिन्यात ५७ लाख ३८ किलोमीटर लातूरची एसटी धावली. त्यात ३४ कोटी २९ लाख ८३ हजारांचा व्यवसाय लातूर विभागाने केला असून, त्यात खर्च वजा जाता २ कोटी ८२ लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती विभागीय वाहतूक निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली.
जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीवर भर...व्यवसाय मिळविण्यासाठी महामंडळाच्या लातूर बसने गेल्या मे महिन्यात जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीवर भर दिला. त्याचा चांगला फायदा लातूरच्या एसटीला झाला आहे. त्याचबरोबर पुणे, मुंबई, नांदेड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या प्रवासी वाहतुकीवरही भर दिल्याने चांगला नफा मिळाला आहे.
५७ लाख ३८ हजार कि.मी. प्रवास...लातूर विभागात गेल्या मे महिन्यामध्ये पाचही आगारांचा मिळून ५७ लाख ३८ हजार कि.मी.चा प्रवास बसेसचा झाला असून, सर्वच आगारांतील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे एसटीला मे महिन्यात नफा झाला आहे. अमृत आणि महिला सन्मान योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने एसटीला दिलासा मिळाला आहे.
३४ कोटी २९ लाख ८३ हजारांचा व्यवसाय...जिल्ह्यातील पाचही आगारांचा मिळून मे महिन्यामध्ये ३४ कोटी २९ लाख ८३ हजारांचा व्यवसाय झाला असून, प्रत्येक किलोमीटरला ६० रुपये या महिन्यामध्ये एसटीला मिळाले आहेत. याच पद्धतीने सेवा देऊन व्यवसाय वाढविण्यावर महामंडळ भर देत आहे.
मे महिना फायद्याचा ठरलामहिला सन्मान योजना, अमृत योजना आणि प्रवासी वाहतुकीवर राबविलेल्या योजना यामुळे मे महिना लातूरसाठी फायद्याचा ठरला आहे. खर्च वजा जाता एसटीला २ कोटी ८२ लाख रुपयांचा नफा झालेला आहे. जिल्हाअंतर्गत आणि मोठ्या शहरांच्या प्रवासी वाहतुकीवर लक्ष दिल्याने हे यश मिळाले आहे. - अभय देशमुख, विभागीय वाहतूक निरीक्षक
असा झाला आगारनिहाय नफा...लातूर १ कोटी ५९ लाखउदगीर ३२ लाख ६४ हजारनिलंगा ८९ लाख ३८ हजारऔसा ५१ लाख ४६ हजार