लातूर : दिवाळीत गाव अन् कुटुंबाची ओढ असल्याने मुंबई-पुण्याला जाणारे हजारो लोक गावाकडे आले. बुधवारी भाऊबीज झाल्यानंतर अनेकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि खासगी प्रवासी वाहनेही सध्या हाऊसफुल्ल आहेत. मुंबई-पुण्याला जाणारी रेल्वे भरगच्च असून, तिकीटही वेटिंगवर आहे.
लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात मागील जवळपास दहा दिवसांपासून प्रवाशांची मोठी गर्दी आहे. याशिवाय, गांधी चौकातील जुने बसस्थानक, अंबाजोगाई रोडवरील नवीन बसस्थानकातही प्रवाशांची रेलचेल आहे. यावर्षी एसटीची दिवाळी सुसाट आहे. राज्य शासनाने महिला प्रवाशांना दिलेली ५० टक्क्यांची सवलत एसटीला चांगलीच पावली आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे रेल्वेही सुसाट असून, मुंबई-पुणे मार्गावर आणखी किमान दहा दिवस आरक्षण वेटिंगवर आहे. नव्याने सुरू झालेल्या हरंगुळ-पुणे रेल्वेलाही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. परिणामी, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावर याचे पडसाद उमटले आहेत.
५० टक्क्यांची सवलत एसटीला पावली...महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत राज्य शासनाने सुरू केल्यामुळे प्रवाशांची संख्या एसटीला वाढली आहे. एरव्ही खासगी ट्रॅव्हल्सकडे ओढा असणारी मंडळी यंदा पहिल्यांदाच बसकडे वळली आहेत. पुण्याहून लातूरला जवळपास ७०० ते ८०० रुपये तिकीट आहे; मात्र बसमध्ये महिलांना सवलत मिळाल्याने ४०० रुपयांतच प्रवास होत आहे. त्यामुळे पत्नीसोबत पतीही बसनेच प्रवास करू लागले आहेत.
रेल्वेत प्रवाशांची तुडुंब गर्दी...लातूर-मुंबई, हरंगुळ-पुणे व इतर रेल्वेलाही प्रवाशांची मोठी गर्दी आहे. दिवाळीचा सण साजरा करून पुन्हा कामावर निघालेले कुटुंबीय सध्या प्रवासासाठी गर्दी करून आहेत. लातूर-पुणे, लातूर-मुंबई प्रवासासाठी आणखी जवळपास दहा दिवस तरी आरक्षण वेटिंगवर असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय जेमतेम...ऐन दिवाळीच्या तोंडावर हरंगुळ-पुणे रेल्वे सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे. रेल्वेचे तिकीटही कमी, प्रवासही सुरक्षित असल्याने अनेकजण रेल्वेकडे वळले आहेत. जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅव्हल्स या मार्गावर धावतात. दिवाळीत तर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अनेक ट्रॅव्हल्स दोन-दोन फेऱ्या करतात. रेल्वेमुळे ट्रॅव्हल्सची प्रवासी संख्या घटली. त्यातच परिवहन विभाग व पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारल्याने उगाच दंड नको म्हणून अनेकांनी काळजी घेत सुरक्षित प्रवासालाच प्राधान्य दिले आहे.
जास्तीच्या प्रवासभाड्याची तक्रार नाही...परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सना एसटीच्या प्रवास भाड्याच्या तुलनेत ५० टक्के भाडेवाढीची मुभा दिली होती. याउपर प्रवासभाडे आकारणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय, शहरातील थांब्यांवर मोठमोठे फलकही लावण्यात आले होते. मागील आठवडाभरात एकाही प्रवाशाने परिवहन विभागाकडे प्रवास भाड्यासंदर्भात लेखी तक्रार केली नाही.- आशुतोष बारकुल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी