- राजकुमार जोंधळेलातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गत ७३ दिवसांपासून लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, एसटी महामंडळ प्रशासनाने आतापर्यंत एकूण ३३१ कामगारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. शनिवारी निलंगा आगारातील ३१ कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आता बडतर्फ कामगार, कर्मचाऱ्यांचा आकडा १२९ पाेहोचला आहे.
महामंडळाच्या लातूर विभागातील जवळपास दोन हजार ६८९ कामगार, कर्मचारीसंख्या आहे. यातील प्रत्यक्ष कामावर आणि साप्ताहिक सुटीवर ६८६ कामगार आहेत. शिवाय, १२० जण अधिकृत रजेवर गेले आहेत. तर, प्रत्यक्ष आंदाेलनामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ८८३ वर आहे. गत ७३ दिवसांमध्ये ११ कंत्राटी कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. तर, ८० जणांची अंतर्गत अन्य आगारांत बदली करण्यात आली आहे. टप्प्या-टप्प्याने ३३१ कामगार, कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा आगारांतील एकूण १२९ कामगार बडतर्फ करण्यात आले असून, शनिवारी निलंगा आगारातील ३१ कामगारांचा समावेश आहे. सर्वाधिक उदगीर आगारातील ६७ कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक क्षीरसागर यांनी दिली.
तीन बसवर दगडफेक...
११ डिसेंबरपासून लातूर विभागातील लातूर, औसा आणि निलंगा आगारांतून जवळपास ४० बस बाहेर पडल्या आहेत. दरम्यान, निलंगा आगारातील दाेन आणि लातूर आगाराच्या एका बसवर नांदेड जिल्ह्यातील माळाकाेळीनजीक दगडफेक करण्यात आली. यामध्ये महामंडळाचे ४५ हजारांचे नुकसान झाले असून, याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उदगीरात सर्वाधिक बडतर्फ...
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारांपैकी उदगीर आगारात ६७ कामगारांना निलंबित करण्यात आले हाेते. त्या सर्वांना चाैकशीअंती बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फ कामगारांचा लातूर विभागाचा आकडा १२९ गेला असून, त्यात उदगीर आणि निलंगा आगारांतील कामगारांची संख्या अधिक आहे. सर्वात कमी अहमदपूरचा आकडा आहे.