- राजकुमार जाेंधळे लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील कामगार, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद (ST Strike) आंदाेलनाचा शुक्रवारी चाैदावा दिवस हाेता. दरम्यान, गत तीन दिवसामध्ये महामंडळ प्रशासनाने लातूर विभागातील एकूण ४४ कामगार आंदाेलकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
गत दाेन आठवड्यांपासून लातूर जिल्ह्यातील लालपरीलची प्रवासी वाहतूक ठप्प आहे. प्रवाशांचे माेठ्या प्रमाणावर हाल सुुरूच आहेत. प्रशासनाने खासगी वाहनांना बसस्थानकातून थेट प्रवाशांची वाहतूक करण्याला मुभा दिली आहे. मात्र, ही यंत्रणा ताेकडी पडत आहे. मिळेल त्या वाहनांनी प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गत चाैदा दिवसांपासून राज्यभरात एसटीच्या कामगार, कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दाेन आठवड्यांनंतरही कामगारांनी संपातून माघार घेतली नसल्याने तिढा कायम आहे. यातून प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. अखेर प्रवाशांची गैरसाेय टाळण्यासाठी प्रशासनाने खासगी ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी, जीप आणि स्कूल व्हॅनला थेट बसस्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याला सवलत दिली आहे. आता महामंडळाच्या बसस्थानकातील फलाटावर लालपरीऐवजी खासगी वाहने दिसू लागली आहेत. लातूर येथून उस्मानाबाद, नांदेड, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ, मुखेड, तुळजापूर, साेलापूर मार्गावर खासगी वाहने सुसाट धावत आहेत. उदगीर बसस्थानकातून अहमदपूर, मुखेड, जळकाेट, लातूर, निलंगा, देवणी मार्गावर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक केली जात आहे.
खासगी वाहतूक यंत्रणा ठरतेय ताेकडी...एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याने लालपरी त्या-त्या आगरामध्ये जाग्यावरच थांबून आहे. परिणामी, प्रवाशांसाठी संबंधित प्रशासनाने आता खासगी वाहनांची साेय केली आहे. मात्र, एस.टी.च्या तुलनेत ही सेवा ताेकडी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. छाेट्या-छाेट्या स्कूल व्हॅनही बसस्थानकातून प्रवासी काेंबून सुुसाट धावत आहेत, तर काही वाहनांकडून दुप्पट तिपट आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीही समाेर येत आहेत. यावर नियंत्रण काेणाचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संपातील कर्मचाऱ्यांवर कारवाई...गत चाैदा दिवसांपासून लातूर विभागातील पाचही आगारात कामबंद आंदाेलन सुुरूच आहे. संप मागे घेत कामावर रुजू हाेण्याबाबत शासन, महामंडळ प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र, याला कामगार, संपकरी आंदाेलक जुमानत नसल्याने महामंडळाकडून आता आंदाेलन कामगारांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. ९ नाेव्हेंबर राेजी ३१, १० नाेव्हेंबर राेजी ८ आणि ११ नाेव्हेंबर राेजी ५ अशा एकूण ४४ कामगार, कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती लातूर विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.