- राजकुमार जाेंधळे लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गत २७ ऑक्टाेबर २०२१ पासून राज्यासह लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगरातील एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाचा रविवारी ७४ वा दिवस हाेता. या काळात लातूर विभागाला माेठा फटका बसला असून, तब्बल ४० काेटींचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. पाच आगारातील ४९० बसेसपैकी ४५० बसेस जाग्यावरच धूळखात पडून आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील पाच आगारात एकूण कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ६८९ आहे. यातील ६८६ कामगार प्रत्यक्ष कामावर आणि साप्ताहिक सुट्टीवर आहेत. अधिकृत रजेवरील कर्मचाऱ्यांची संख्या १२० च्या घरात आहे. तर प्रत्यक्ष आंदाेलनामध्ये १ हजार ८८३ कर्मचारी, कामगार सहभागी आहेत. टप्प्या-टप्प्याने काही कामगार, कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर ११ डिसेंबरला लातूर विभागात पहिली लालपरी धावली. आता या लालपरींचा आकडा ४० वर पाेहचला आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून संपकरी, आंदाेलक चालक, वाहकांचे समुपदेशन करुन कामावर परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही कामगारांकडून प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, बहुतांश कामगार आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत.
दरराेज ६० लाखांचे उत्पन्न...
लातूर विभागातील पाच आगरातील एकूण दैनंदिन उत्पन्नाचा आकडा ५५ ते ६० लाखांच्या घरात हाेता. मात्र, ताे काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून ५ ते १० लाखांच्या घरातच अडकला आहे. आता तर गत ७४ दिवसांपासून महामंडळाची प्रवासी वाहतूकच बंद असल्याने आर्थचक्रही जाग्यावरच थांबले आहे. परिणामी, संपाच्या काळात लातूर विभागाला तब्बल ४० काेटींचा आर्थिक फटका बसला आहे.
दुरुसती, देखभालीचा खर्चही आला अंगलट...
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात एकूण ४५० लालपरी जाग्यावरच थांबून आहेत. सध्या या बसेसमध्ये तांत्रिक बिघाड हाेत आहेत. दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही आता महामंडळाला पदरमाेड करुन करावा लागत आहे. काेराेनाने एसटी महामंडळ डबघाईला आले आहे. त्यातच संपाचा माेठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी, महामंडळ सलाईनवर आहे.