रबी हंगामातील पेरण्यांना वेग
लातूर : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला असल्याने रबी हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाण्यांसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा असल्याने रबी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
हरंगुळ नवीन वसाहत रस्त्याची दुरवस्था
लातूर : शहरापासून जवळ असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला असून, खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ता नादुरुस्त झाला आहे.
गुलाबी थंडी वाढली
लातूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती. मात्र, तीन दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे ऊबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची पसंती आहे. शहरातील विविध चौकांत ऊबदार कपड्यांची दुकाने थाटली असल्याचे चित्र आहे.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
लातूर : राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश स्वामी, तुकाराम दोडके, अन्वर सय्यद, योगेश गंगणे, वैभव कोदरे, विशाल काळे, गणेश मोरे, अमजद शेख यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव, विशाल देवकते, सतीश बोडके, एजाज शेख, ज्ञानोबा जाधव उपस्थित होते.
शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
लातूर : फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयाने यश मिळविले आहे. गुणवंतांमध्ये नागेश भिंगे, नंदिनी बोयणे, निखिल भारती, दीपक पाटील, सोनाली कोकाटे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे बबन भोसले, सोमेश्वर पाटील, एन. एन. वांगसकर, सुरेखा मस्के, ललिता बिराजदार, एन. व्ही. पांचाळ, एस. पी. साखरे आदींनी कौतुक केले आहे.
शृंगारे यांची निवड
लातूर : अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी नामदेव शृंगारे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल लालासाहेब गायकवाड, ॲड. संजय कांबळे, मधुकर आल्टे, कमलाकर कावळे, सिद्धार्थ कांबळे, तुकाराम गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुष्पा महालिंगे यांची निवड करण्यात आली.
कोरोना जनजागृती
लातूर : तालुक्यातील धनेगाव येथील आधार फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच भित्तिपत्रकेही गावोगावी वाटप केली जात असून, नागरिकांनी बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही फाऊंडेशनच्या वतीने केले आहे.
अपंग दिनानिमित्त दिव्यांगांचा साहित्याचे वाटप
लातूर : जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठाण महाराष्ट्रच्या वतीने लातुरात दिव्यांग बांधवांचा सत्कार करून साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अहेमदभाई हरणमारे, कोषाध्यक्ष बिलाल हरणमारे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, इस्माईल शेख, रवी सुडे, मुन्ना हाशमी, ज्योती मारकडे, निसार शेख, दीपमाला तूपकर, अन्सार शेख यांची उपस्थिती होती. जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग हक्क स्वाभिमान प्रतिष्ठाणच्या वतीने दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले.