संदीप शिंदे, लातूरजळकोट : तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिके, जमिनी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर उभे असून, एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी येथे रविवारी केले.
जळकोट तालुक्यातील रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, गुत्ती, घोणसी, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, चिंचोली आदी नुकसानग्रस्त गाव, शेतांची मंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, महावितरणचे अभियंता सयास दराडे आदी उपस्थित होते.
दोन पुल नव्याने बांधण्यात येणार...जळकोट तालुक्यातील नुकसानीची माहिती शासनास दिली असून, मरसांगवी गावाजवळील वाहून गेलेले दोन्ही पुल नव्याने बांधण्यात येतील अशी घोषणाही मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी केली. याप्रसंगी रावणकोळा येथील घराचे नुकसान झालेल्या नऊ जणांना मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असून, रस्ते, पुलाचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेशही क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिले.