लातूर : क्रीडा संकूलात सुरु असलेल्या २८ व्या मुलांच्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत उपांत्यपुर्व व उपांत्य सामने रंगतदार झाले. यात विजय मिळवित अहमदनगर व जळगाव संघाने अंतिम फेरीत मुसंडी मारली आहे.
लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोशिएशन व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोशिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बुधवारी सकाळी उपांत्यपुर्व फेरीचे सामने झाले. यात जळगावने नाशिकचा ४ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अहमदनगरने जळगावचा ७-१ असा पराभव केला. तर सोलापुरने एकतर्फी सामन्यात यवतमाळचा ५ धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अहमदनगरने अमरावतीचा अटीतटीच्या लढतीत २-१ असा अवघ्या एका धावेने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात जळगावने सोलापूरचा ४ धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकासाठी अमरावती विरुद्ध सोलापूर हा सामना होणार असून, विजेतेपदासाठी जळगाव विरुद्ध अहमदनगर हा सामना रंगणार आहे. सामन्यानंतर विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
खेळाडूंची जोरदार बॅटींग...लातूरातील क्रीडा संकूलात सुरु असलेल्या या स्पर्धेत राज्यातील २० संघांनी सहभाग नाेंदविला असून, साखळी सामन्यात प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंनी कौशल्य पणाला लावले होते. लातूरच्या प्रेक्षकांना सॉफ्टबॉल खेळाची उत्कृष्ट बॅटींग या निमित्ताने पहावयास मिळाली.