लातूर : घरफाेडीसह माेबाईल टाॅवरच्या बॅटऱ्यांची चाेरी करणाऱ्या एका परप्रांतीय आराेपीला उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पथकाने उचलले आहे. त्यांच्याकडून चांदीची भांडी, टाॅवरच्या बॅटऱ्या असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक चाैकशी केली असता, तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
उदगीर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत घरफाेडी करून, ६० हजारांच्या किमतीची चांदीची विविध भांडी पळविली हाेती. त्याचबराेबर माेबाईल टाॅवरच्या बॅटऱ्याही पळविल्या. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले. या आदेशानंतर पाेलिस पथकाने शाेधमाेहीम सुरू केली. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अब्दुल्ला आबेद खान (वय २५, रा. मेहंदीपटनम, हैदराबाद, तेलंगणा, ह.मु. बनशेळकी रोड, उदगीर) याला २१ नाेव्हेंबर राेजी ताब्यात घेतले. त्याची अधिक चाैकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चाेरीतील चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहेत. त्याला अधिक विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांचीही चाेरी केल्याची कबुली दिली. यावेळी एकूण एक लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीण ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा चाैकशीमध्ये उलगडा झाला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, अंमलदार व्यंकट शिरसे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नामदेव चेवले, अभिजित लोखंडे, नजीर बागवान यांच्या पथकाने केली.