- आकाश मोरे/बाबासाहेब काळे
मुरुड/बोरगाव काळे (जि. लातूर) : लातूरहून पुणे-वल्लभनगरकडे जाणाऱ्या एसटी बसचा बोरगाव काळे नजीक रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली घसरल्याची मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लातूर आगारातून मंगळवारी सकाळी एमएच २० बीएल २३७२ क्रमांकाची एसटी बस पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस बोरगाव काळे नजीक आली असता अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस पुलाच्या खाली घसरली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले असून, प्रत्यक्षदर्शीनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून १६ जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, बस पुलाखाली घसरल्याने बसच्या समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामध्ये चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, इतर प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे लातूर वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.