लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला असून, यातील काहींना दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला; मात्र त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली असून, यातील अनेकांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही लागली नाही. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा उपाय चांगला आहे. हा दिलासा असून, आरोग्य विभागाच्या निरीक्षणानंतर ही दिलासादायक बाब समोर आली आहे. एकही मृत्यू लसीकरणानंतर आढळलेला नाही.
जिल्ह्यात १६ हजारांवर बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यातील ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यांच्यातील लक्षणे अतिसौम्य असून, यातील काही मोजक्या व्यक्तींनी लस घेतली होती. त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली असून, आरोग्य विभागातीलच काही कर्मचाऱ्यांची उदाहरणे आहेत. ना ऑक्सिजनची गरज लागली, ना व्हेंटिलेटरची ना रेमडेसिविरची. घरीच ते बरे झाले. लसीकरणाचा हा फायदा असल्याचे आरोग्य विभागाचे ठाम मत आहे.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ दोन टक्के पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १६ हजार ३६ जणांनी लस घेतली आहे. यातील १ लाख ९३ हजार ४२६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दोन्हीही डोस २२ हजार ६१० लोकांनी घेतले आहेत.
आरोग्य विभागाने लस घेतलेल्या व्यक्तींना झालेल्या संसर्गाबाबत निरीक्षण केले असता, त्यांच्यात अतिसौम्य लक्षणे आढळली. साध्या उपचारानेच ते बरे झाले. पहिला डोस घेतलेल्यांपैकी २ टक्क्यांपेक्षा कमी जणांना संसर्ग झाला असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.
लस महत्त्वाची
लस घेऊन काही बाधित आढळलेल्या रुग्णांशी संपर्क साधला असता, त्यांनी एकदम सौम्य लक्षणे आणि काहीच त्रास नसल्याचे सांगितले. त्यामुळे लस महत्त्वाची आहे. धोका कमी आहे. १ मे नंतर आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच ती दिली जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.