नागरसोगा : औसा- नागरसोगा- जवळगा (पो.) - लिंबाळा दाऊ या मार्गाच्या दुरुस्तीसाठी काही महिन्यांपूर्वी खडी अंथरण्यात आली. परंतु, अद्यापही डांबरीकरण झाले नाही. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत असून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर या मार्गावरून सतत ये- जा करणाऱ्यांना मणक्याचा त्रास होत आहे.
औसा- नागरसोगा- जवळगा पो- लिंबाळा दाऊ या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी औशाच्या माळापासून ते नागरसोगा येथील महावितरण कार्यालयापर्यंतच्या ४ किमी अंतरावर खडी टाकण्यात आली. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.
औसा- नागरसोगा- दापेगाव- जवळगा- हरेगाव व गुबाळ हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. मुळातच काही ठिकाणी अरुंद असून काही ठिकाणच्या साईडपट्ट्या उखडल्या आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनास रस्ता देताना वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात खडी अंथरण्यात आल्याने वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांना मणक्याचा त्रास होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी अन्य काही ठिकाणचे खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
लवकरच काम केले जाईल...
औसा ते नागरसोगा या ४ किमीचे काम अर्धवट राहिले आहे. मागील कामाचे काही बिल अजून अदा करण्यात आले नाही. या रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गुत्तेदारास कामाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. जूनपर्यंत काम पूर्ण केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. के. कोळगे म्हणाले.