लातूर - रेणापूर-पिंपळफाटा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करुन कारवाई करावी, या मागणीसाठी रेणापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने रेणापूर-पिंपळफाटा येथे शनिवारी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत निवेदन देण्यात आले. यापूर्वीही अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले होते, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. संबंधित कंत्राटदार पूर्वीप्रमाणेच काम करीत असून रेणापूर-पिंपळफाटा ते बोरवटीदरम्यान एकेरी मार्गाचे काम पूर्वीचा रस्ता खोदून त्यावरच मुरुम टाकून दबई केली जात आहे. एका बाजूने रस्ता चांगला होत आहे, पण याच भागात रस्त्यावरील दुसरी बाजू निकृष्ट दर्जाची होत आहे. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार साळुंके, राजेसाहेब चव्हाण, बालाजी घडसे, उत्तम राठोड, अवधूत कातळे, महादेव राठोड, रमेश शितोळे, पंकज पांचाळ, शरद ठाकूर, राजकुमार साळुंके, बापू झेंडे, रामप्रसाद पुरी, कृष्णा शितोळे, श्रीमंत शीतोळे, राजेसाहेब सरपंच, पद्माकर शितोळे, व्यंकटी शितोळे, गजानन शितोळे, संतोष शितोळे, महादेव लोखंडे, शरद भिसे, रामराव बिडवे, नंदू गिरी, शिवाजी जाधव, अन्वर शेख, परशुराम राठोड, सादिक शेख, चांदसाब शेख, रमेश कातळे, अमोल गुजर, प्रवीण देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पूर्वीच दिला होता इशारा...रेणापूर-पिंपळफाटा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची आठ दिवसात चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा रास्ता रोकोचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला होते. निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याने शनिवारी सकाळी १०.३० ते ११.३० या काळात रेणापूर पिंपळफाटा येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बालाजी कदम यांचा नेतृत्वाखाली एक तास आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नायब तहसीलदार गिरी यांनी मागणीचे निवेदन स्वीकारून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रेणापूर-पिंपळफाटा-लातूर महामार्ग रस्ता कामाच्या चौकशीसाठी रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 5:26 PM