लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यासाठी महामंडळाने व्हेकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. डेपो, बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टीमद्वारे बसवर नियंत्रण राहणार आहे.
गाडीचा वेग, लोकेशन आणि थांबा या सिस्टीमद्वारे कळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लागलीच वॉर्निंग बेल येते. थांबा नसताना बस थांबवली तर अलर्ट टोन येते. सिस्टीममधल्या या फायद्याच्या बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. गेल्या महिनाभरापासून या सिस्टीमद्वारे लातूर आगारात गाड्यांचे नियंत्रण सुरू झाले आहे.
लातूर आगारात ही सिस्टीम सुरू झाली असून, बसस्थानकामध्ये मोठा डिजिटल बोर्ड लागला आहे.
गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील व प्रवाशांची सोय होईल.
गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहितीही या सिस्टीममुळे कळते.
बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन
व्हीटीएस प्रणालीचे बसस्थानकात मोठे स्क्रीन लागले असून, प्रवाशांना उदगीरहून येणाऱ्या गाडीची माहिती हवी असल्यास त्या गाडीचे लोकेशन या स्क्रीनवर कळणार आहे. त्यानुसार बस बसस्थानकात किती वेळात येऊ शकते, याचा अंदाज प्रवाशालाही बांधता येईल.
थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टीममुळे स्क्रीनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वाॅर्निंग बेलही ही सिस्टीम देते.
रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टीममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टीमचे राहते.
चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबवता येणार नाही
प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळते.
आगार व्यवस्थापकांकडे त्याचा खुलासा चालक-वाहकांना करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.
प्रवाशांनाही आता बसस्थानकात गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टीमद्वारे कळणार आहे.