लातूर : शहरामध्ये ऑटोरिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत थांब्यांची संख्या वाढविली जात नाही. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक कुठेही थांबून प्रवासी घेतात. परिणामी, वाहतूक कोंडी अथवा रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी थांबे वाढविण्याची गरज असल्याचे ऑटोरिक्षा चालक संघटनांचे म्हणणे आहे.
शहरात सद्यस्थितीत ५५ थांबे आहेत. सरासरी एका थांब्यावर दहा ते पंधरा ऑटोरिक्षा थांबण्याची क्षमता आहे. त्यानुसार थांब्यावर ६०० च्या आसपास ऑटोरिक्षा असतात. तर याचवेळी रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटोंची संख्या हजार ते दीड हजारांच्या आसपास असू शकते.उर्वरित ४ हजार ऑटोंनी थांबायचे कुठे, असा प्रश्न ऑटो चालकांना सतावत आहे. त्यामुळे ऑटो चालकांच्या काही संघटनांनी ‘होऊ द्या चर्चा’ असा प्रश्न घेऊन १२ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, हनुमान चौक, गांधी चौक, पाच नंबर चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, अहिल्यादेवी होळकर चौक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.औसा रोड रेमंड शोरुम नजीक, राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक-२, बसवेश्वर चौक-२, गूळ मार्केट, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक.विवेकानंद चौक, गरुड चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक, बाभळगाव चौक, म्हाडा कॉलनी प्रवेशद्वार, आरटीओ ऑफिस आदी ठिकाणी अधिकृत थांबे आहेत.
किमान १५० थांबे असावेतशहरामध्ये किमान १५० थांबे करण्यात यावेत, अशी मागणी रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी तसेच परवानाधारक ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी केली आहे. थांबे वाढविल्यानंतर वाटेतच ऑटो थांबवून प्रवासी घेण्याचे प्रमाण कमी होऊन रहदारीला अडथळा होणार नाही. ऑटो थांबण्याची क्षमता वाढविल्यानंतर जागोजागी ऑटो थांबणार नाहीत. यामुळे ऑटो चालकांवर खटले दाखल होण्याचे प्रमाणही कमी होईल.
थांबे वाढविण्याबरोबरच या आहेत मागण्या...ऑटोरिक्षा परमिट बंद करण्यात यावे, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी घोषित केलेले ५ कोटी रुपये देऊन अंमलबजावणी करावी, रिक्षाचालकांच्या वारसांना आर्थिक मदत करावी, लातूर शहरातील सिटी बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात. ते नियमानुसार घेण्यात यावेत.