राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील पापविनाश राेड परिसरातील एका शेतात २० वर्षीय युवकाचे माेकाट तीन कुत्र्यांनी लचके ताेडले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा शासकीय रुग्णालयात सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय मदने (वय २०, रा. सुळ गल्ली, लातूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिसात नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील सुळ गल्लीत राहणाऱ्या विजय मदने याच्यासह अन्य दाेन मित्र पापविनाश राेड परिसरात असलेल्या एका शेतात साेमवारी रात्री पार्टी करत हाेते. दरम्यान, रात्री उशिरा साेबतचे दाेन मित्र तेथून गेले. विजय मदने हा त्याचठिकाणी झाेपाला हाेता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तीन माेकाट कुत्रे विजयवर तुटून पडले. कुत्र्यांनी विजयचे लचके ताेडायला सुरुवात केली. त्यावेळी कुत्र्यांचा प्रतिकार करण्याचीही क्षमता विजयमध्ये नव्हती. अशा अवस्थेत कुत्र्यांनी विजयच्या शरीराचे माेठ्या प्रमाणावर लचके ताेडल्याने ताे गंभीर जखमी झाला. सकाळी परिसरातील नागरिकांना विजय जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती शिवाजीनगर पाेलिस ठाण्याला मिळाल्यानंतर पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याला लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सीसीटीव्हीमध्ये घटना झाली कैद...
पापविनाश राेड परिसरात घटनास्थळानजीक असलेल्या सीसीटीव्हीची पाेलिसांनी तातडीने पाहणी केली. एका सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याने विजयच्या मृत्यूचे प्राथमिक कारण समाेर आले आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या असून, लचके ताेडल्याचेही दिसून येत आहे, असे डाॅक्टरांनी सांगितल्याची माहिती पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली.