लातूर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांची पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५९ विद्युत पंप, १६१ स्टार्टर्स, १२३ बंडल वायर आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच ८७६ वीजजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे. तरीही नागरिकांच्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन तयार करण्यात आला आहे. ०२३८२-२२०२०४ हा या कक्षाचा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा केला जाईल.
मांजरा प्रकल्प ०.३४ टक्के जिवंत साठामांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे. मृत आणि जिवंत मिळून एकूण पाणीसाठा ४७.७३७ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर केला तर सप्टेंबरपर्यंत पुरू शकते.
गाळ काढण्याची मोहिमे गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे मांजरा प्रकल्पात यंदा पाणी वाढण्याची शक्यता सध्या जिल्ह्यातील धरणातून गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळमुक्त धरण हे अभियान राबविले जात आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातीलही गाळ काढण्याची मोहीम आहे. आतापर्यंत १.६५ लाख घनमीटर गाळ या प्रकल्पातील काढण्यात आला असल्याची माहिती शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली. दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना हा गाळ अनुदानावर देण्याची मोहीम आहे. ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी अनुदान गाळ टाकल्यानंतर आहे. वाहतुकीचा खर्च निघावा, असा हेतू यामागे आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातून काढलेला गाळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेऊन गेला आहे. धरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे दुप्पट सुपिकता वाढते. त्यामुळे गाळ घेऊन जाण्याला परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. मांजरा प्रकल्पाकडे ज्या शेतकऱ्यांनी गाळ नेला आहे, त्या शेतकऱ्यांचा शेती गट नंबर तसेच किती गाळ नेला, याची नोंद आहे. त्यानुसार शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो, अशीही माहिती शाखाधिकाऱ्यांनी दिली.
मांजरा प्रकल्पात मोठा गाळमांजरा प्रकल्पात १६.२२७ दलघमी गाळ साठला आहे. त्यामुळे ८.४१२ टक्के संचयी पाण्याचे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी सध्या गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळामुळे जमिनीचा पोत सुधारतो, शिवाय धरणामध्येही पाण्याची साठवण क्षमता वाढते. गेल्या ४१ वर्षांत मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचलेला आहे. हा गाळ काढला तर पाण्याचे नुकसान होणार नाही.