लातूर : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यांमधील खाजगीकरण बंद करावे, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारपासून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या संपामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरावीत, इंप्लॅनमेंट पद्धतीने कंत्राटीकरण बंद करावे, महावितरणमधील २०१९ नंतरचे सर्व उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवणे व त्या उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करावी, जनतेच्या मालकीच्या जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ४ ते ६ जानेवारी या कालावधीत हा संप सुरू राहणार असून, यामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.