लातूर : मनपात सध्या प्रशासकराज आहे. पदाधिकारी, नगरसेवक माजी झाले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रश्नाचे कोणाला देणे-घेणे उरलेले नाही. पहिल्याच पावसात शहरवासीयांची तारांबळ उडाली. तुंबलेल्या गटारी रस्त्यावर उलटल्या. सगळी घाण लोकांच्या दारात आणि काहींच्या घरातही गेली. जणू पुढे महापालिकेची निवडणूकच होणार नाही आणि त्या माजी नगरसेवकांना वा इच्छुकांना निवडणूकच लढवायची नाही, अशा समजुतीत सगळे घरात आहेत.
मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. जागोजागी पाणी तुंबले. मुख्य रस्ते, भुयारी मार्ग इतकेच नव्हे तर रिंग रोडवरसुद्धा पाणीच पाणी होते. कदाचित पुढच्या काही तासांत त्याचा निचरा होईल; परंतु अनेकांच्या दारात पोहोचलेली घाण आणि दुर्गंधी काही दिवस तरी त्रासदायक ठरणार आहे.
कुठे गेले माजी बहाद्दर..!प्रत्येक सोहळ्यांमध्ये मिरवायचे, सोशल मीडियात चमकवायचे हे बरे सुचते. मनपाचा विषय आला की आता प्रशासकराज म्हणून मोकळे. आमचे कोणी ऐकत नाही, हे सांगून नामानिराळे. अर्थात याला काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, सेना कोणीच अपवाद नाही. कोणी ऐकत नसेल तर ठिय्या मांडा. प्रशासनाच्या दारात बसा, अधिकाऱ्यांना जागचे उठू देऊ नका. जे खुर्चीवरच बसत नाहीत, त्या रिकाम्या खुर्च्यांना मैदानात आणा, अशा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. प्रशासनाची जबाबदारी आहेच; परंतु ज्यांना लोकांची मते मागायला दारात जायचे आहे, त्यांनी निदान झालेल्या विपरीत अवस्थेचा आढावा घेऊन संबंधितांना धारेवर धरावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
संघटना गेल्या कुठे?माहिती अधिकाराचा अर्ज टाकणे आणि मिळालेल्या माहितीच्या कुरणावर दिवस काढणाऱ्यांबद्दल बोलणार नाही; परंतु जनहिताचा टेंभा मिरविणाऱ्या संघटना तरी जाग्या होणार आहेत की नाही, असा सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत.
काय आहेत प्रश्न...कंत्राटाचा वाद-विवाद जे काही आहे ते लवकर संपवा. शहरातील अस्वच्छता दूर करा. हे शहर कधी काळी स्वच्छ होते, अशी आजची स्थिती आहे. स्वच्छतेचा पुरस्कार आणि गौरव झालेली महापालिका आहे, याची आठवण पुन्हा करून द्या.कचरा जागोजागी जाळला जातो. हजार तक्रारी केल्या असतील. छायाचित्रे, व्हिडीओ माध्यमातून फिरत असतात. कोणीच दखल घेत नाही. किमान अज्ञाताविरुद्ध तरी गुन्हे दाखल करा.नाल्या तुडुंब भरल्या आहेत. काही बहाद्दर नागरिक दुसऱ्याच्या दारातील घाण आपल्याकडे नको म्हणून जाळ्या ठोकून नाल्या अडवितात. तक्रारी करूनही कारवाई होत नाही.मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी अनेक ठिकाणी खड्डे आहेत.राजस्थान विद्यालय ते बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत असणाऱ्या समांतर रस्त्यांवर खड्डे, अस्वच्छता, कचरा आणि अवैध पार्किंग असते. तो रस्ता एक वाहन जाण्यापुरता तरी मोकळा होणार आहे की नाही.छत्रपती चौक ते पीव्हीआर सिनेमागृहापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा डेपो झालेला आहे.अंतर्गत रस्त्यांवर बांधकाम साहित्य, खड्डे आणि अस्वच्छतेचे थैमान आहे.