शासनाने ग्रामीण भागामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी पालक, ग्रामपंचायतींचे नाहरकत प्रमाणपत्राची अट आहे. त्यानुसार या अटीची पूर्तता केलेल्या लातूर विभागातील १ हजार ९६८ शाळांपैकी ७१६ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये १ लाख ८९ हजार १६७ विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ८७८ शाळांपैकी १०७ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ३ लाख १३ हजार १८८ विद्यार्थी असले तरी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ ते १० हजार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ६४० शाळा आहेत. त्यापैकी २१९ शाळा सुरू असून, २० हजार १२५ एकूण विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी ८ हजार ११५ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. तर नांदेड जिल्ह्यामध्ये ६४० शाळा असून, २१९ शाळा सुरू झाल्या आहेत. २ लाख ५५ हजार विद्यार्थी संख्या असून, १ लाख ७५ हजार विद्यार्थी दररोज उपस्थित राहत आहेत.
३६ टक्के शाळांना मिळाले नाहरकत प्रमाणपत्र...
आठवी ते बारावीपर्यंतच्या लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांत १ हजार ९६८ शाळा आहेत. त्यापैकी ७१६ शाळांना संबंधित ग्रामपंचायतींकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. या शाळांतील अनेक पालकांनी शाळेत पाल्य पाठविण्यासाठी सहमतीपत्र दिले आहे. त्यानुसार लातूर विभागात ३६ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत.