लातूर : सरळी सेवा परीक्षेचे शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी करीत अभाविपच्या वतीने शहरातील दयानंद गेट येथे शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विभागाची पदे भरली जातात. या परीक्षा घेण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांकडे दिली आहे. या संस्था परीक्षा शुल्क म्हणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ९०० रुपये तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये घेत आहेत. यापूर्वी हे शुल्क मागासवर्गीयांसाठी ३०० रुपये व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये होते. परंतु, सध्या या संस्था स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली भरमसाठ शुल्काची आकारणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत.
महाराष्ट्र शासनाची एमपीएससी ही संस्थाही एवढे शुल्क आकारत नाही. त्यामुळे वाढलेले परीक्षा शुल्क पूर्ववत करण्यात यावे. २०१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सरळ सेवा परीक्षेचे फॉर्म भरले होते. परंतु, त्यांची परीक्षा झाली नाही. अशा विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविपच्या देवगिरी प्रदेश सहमंत्री सुरज साबळे, महानगर सहमंत्री वैभव चव्हाण, योगेश कोलबुध्दे यांच्यासह विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते.