- संदीप शिंदेलातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दहावीचे ३८ हजार १५५, तर बारावीचे ३५ हजार ४६५, असे एकूण ७३ हजार ६२० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. दरम्यान, यंदा परीक्षेवर भरारी अन् बैठ्या पथकांची नजर राहणार असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात, यासाठी लातूर विभागीय मंडळाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेच्या संबंधित शाळा, महाविद्यालयात घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव नसल्याने त्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळही देण्यात आला होता. मात्र, यंदा होम सेंटर व वाढीव वेळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परिपूर्ण तयारी करूनच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. लातूर विभागीय मंडळात दहावीसाठी ३८ हजार १५५, तर बारावीसाठी ३५ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे विभागीय मंडळाकडून सांगण्यात आले.
२१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा...माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे. २१ मार्चपर्यंत या परीक्षा चालणार असून, दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार असून, जानेवारीच्या शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदा नियमित वर्ग भरले असल्याने विद्यार्थीही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत.
विभागातून दोन लाख विद्यार्थी देणार परीक्षालातूर विभागीय मंडळात नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, दहावी परीक्षेला नांदेड जिल्ह्यातील ४५५१९, लातूर ३८१५५, उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९५७ असे एकूण १ लाख ५ हजार ६३१, तर बारावीचे नांदेड जिल्ह्यातील ३९७४९, उस्मानाबाद १६३४१, तर लातूर जिल्ह्यातील ३५ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली आहे. दहावी आणि बारावी, असे दोन्ही मिळून १ लाख ९७ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
कॉपीमुक्ती फास्ट विथ झूम वेबकास्टदहावी- बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्ती फास्ट विथ झूम वेबकास्ट हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. यामध्ये झूम लिंक प्रत्येक हॉलमधील पर्यवेक्षकाकडे देऊन पेपर कालावधीत वर्गातील लाइव्ह चित्रीकरण बोर्डात दिसण्याची सोय करता येणार आहे. कमी खर्चामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून हे अभियान राबविण्याचा मानस आहे. राज्य शिक्षण मंडळ व शासनाची या उपक्रमसाठी परवानगी मिळाली तरच हा उपक्रम राबविण्यात येईल.-सुधाकर तेलंग, अध्यक्ष, विभागीय मंडळ, लातूर