हरंगुळ बु. : कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समोर आलेल्या संकटांना मात देण्याची तयारी असल्यास यशाला गवसणी घालता येते, हे हरंगुळ बु. येथील गणेश संजय जटाळ याने सिद्ध करून दाखविले आहे. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, पोलिस उपनिरीक्षक आणि तलाठी या तिन्ही पदांसाठी त्याची एकाचवेळी निवड झाली असल्याने त्याने शासकीय पदांची ‘हॅट् ट्रिक’ साधली आहे.
हरंगुळ बु. येथील गणेश जटाळ याने प्राथमिक शिक्षण हरंगुळ येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर तिसरी ते दहावीचे शिक्षण परभणी जिल्ह्यातील सेलू, अकरावी आणि बारावी लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय तर अभियांत्रिकीचे शिक्षण नांदेड येथून घेतले. शालेय जीवनापासून शासकीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याने गणेशने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घरीच अभ्यास करीत त्याने एसटीआय २०२३, पीएसआय २०२२ आणि तलाठी भरती २०२४ या तिन्ही परीक्षेत यश संपादन केले आहे. सद्य:स्थितीत त्याचे एसटीआयचे कागदपत्र पडताळणी तर पीएसआयची मैदानी चाचणी शिल्लक आहे.
आता त्याने परभणी जिल्ह्यात तलाठी म्हणून नियुक्ती स्वीकारली असून, आगामी काळातही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवण्याचा गणेशचा मानस आहे. गणेशने सहायक कक्ष अधिकारी या पदाचीही परीक्षा दिलेली असून, त्यातही निश्चितच यश मिळेल, अशी त्याला खात्री आहे. एसटीआयची कागदपत्रे पडताळणी बाकी असल्याने त्याने तलाठी पदासाठी नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एकाच वेळी तीन शासकीय पदांसाठी निवड झाल्याने गणेशचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
कठोर परिश्रम असल्यास यश मिळतेच...स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आई-वडील, भाऊ यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्यामुळेच या पदासाठी तयारी करू शकले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, मेहनत घेतल्यास निश्चितच यश मिळते. अपयश आले तरी खचून न जाता जोमाने पुढील तयारीला लागावे. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक अभ्यास आणि मेहनतीवर भर द्यावा, असे आवाहन गणेश जटाळ याने केले आहे.