समाधान कोळी उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील एकंबीवाडीतील वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या एका डबक्यातील पाणी प्यायल्याने दमा, मधुमेह, रक्तदाब, अंगदुखी, मुतखडा हे आजार कमी होतात, अशी अफवा कोणीतरी पसरविली. त्यामुळे दोन महिन्यांपासून दररोज २०० ते २५० नागरिक तेथील पाणी नेण्यासाठी गर्दी करीत आहे.
एकंबीवाडी (ता. औसा) येथे वनविभागाची ११० एकर जमीन असून तिथे विविध जातीचे वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती आहेत. तसेच ५ पाझर तलाव आहेत. याच भागात एक डबके आहे. या डबक्यात येणाऱ्या पाण्यात वनस्पतींच्या मुळातील रस मिसळतो. हे पाणी पिल्याने दमा, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू, अंगदुखी, मुतखडा, गुडघेदुखी, पित्त अशा विविध प्रकारचे आजार कमी होतात, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून एकंबी, टाका, उजनी, बिरवली, चिंचोली, पाडोळी, टाकळी, कोंड, जगजी येथील नागरिक पाणी नेण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, ही अफवा परजिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने लातूरसह उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, बीड, नांदेड या जिल्ह्यातील काही नागरिकही पाणी घेऊन जात असल्याचे परिसरातील शेतकरी लिंबराज चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, या डबक्याच्या भोवती दगडाचे कडेही बांधण्यात आले आहे.
पाणी नमुन्याच्या अहवालाबाबत अनभिज्ञ...
वनविभागाच्या डबक्यातील नागरिक काही दिवसांपासून पाणी घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही दोन महिन्यांपूर्वी पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. परंतु, त्यानंतर त्याची अद्यापही आम्हाला माहिती मिळाली नाही, असे एकंबीचे उपसरपंच जीवन चव्हाण यांनी सांगितले.
शास्त्रीय आधार नाही...
डबक्यातील पाण्यामुळे काही आजार कमी होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र, या पाण्याची कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कुठलाही शास्त्रीय आधार नाही, असे लातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.
भूलथापांना बळी पडू नये...
तपासणीनंतर ते पिण्यासाठी योग्य की अयोग्य याची माहिती मिळेल. सद्यस्थितीत नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उजनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. देवणीकर म्हणाले.