लातूर : भरधाव कारने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून, एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील औसा येथील एका सीएनजी पंपावर शनिवारी सकाळी घडली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा येथून भरधाव कार (एम.एच. २४ बी. आर. ७८६८) लातूरच्या दिशेने शनिवारी सकाळी निघाली होती. दरम्यान, नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील औसा एमआयडीसी येथे सीएनजी पंपानजीक सोडण्यात आलेल्या रस्त्यावर अचानक समोरुन आलेल्या ऑटोला (एम. एच. २४ ए. टी. ६३१३) वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार सीएनजी पंपानजीकच्या हॉटेलवर आदळली.
या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार तर हॉटेलवर मावशीला कामासाठी सोडण्यासाठी आलेला मुलगा ओंकार कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. तर हॉटेलसमोर थांबलेल्या टेम्पोलाही (एम.एच. २५ ए.एफ. २८०८) या कारने जोराची धडक दिली आहे. या भीषण अपघातात ठार झालेले दोघे लातूर शहरातील हत्ते नगर आणि साठ फुटी रोड परिसरातील आहेत. घटनास्थळी औसा ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.