लातूर : शहरातील लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे चाैकात असलेल्या पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारला शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे दिसून आले. यामध्ये कारचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, गंजगाेलाई परिसरात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चाैकालगत चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पार्किंगमध्ये वाहनचालकाने आपली कार (एम.एच. ०१ व्ही.ए. १०९४) थांबविली हाेती. दरम्यान, दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
ही आग नेमकी काेणत्या कारणाने लागली, हे मात्र समजू शकले नाही. कारला आग लागल्याने परिसरातील व्यापारी, नागरिकांनी एकच गर्दी केली. कांहीनी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीमध्ये कारचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतील भाग पूर्णत: खाक झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच गांधी चाैक पाेलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असून, आगीच्या कारणाचा शाेध घेतला जात आहे. या घटनेत कारचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शाेध पाेलीस घेत आहेत, असे पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे म्हणाले. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.