शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र मोडित काढले होते. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळले असून, तालुक्यात यंदा २ हजार ८०० हेक्टर्सवर नवीन ऊसाची लागवड झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगावसारखे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. त्यामुळे जवळपास अडीच हजार हेक्टर्सवरील ऊसाचे क्षेत्र मोडित निघाले होते. परंतु यंदा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तीन-चार वर्षांपासून अल्प पाणीसाठा असणारे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळले आहेत. त्यातच जागृती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास योजनेअंतर्गत लाभ क्षेत्रातील विविध गावात शेतकरी मेळावे घेऊन रोपे आणि बेणे देण्यास सुरुवात केली. त्यास अनेक गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवाय, काही शेतकऱ्यांनी स्वतः चे बेणे वापरून नवीन ऊसाची लागवड केली आहे. परिणामी शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा २ हजार ८०० हेक्टर्सवर नवीन ऊसाची लागवड झाली आहे.
शंभर शेतकऱ्यांना जागृतीचा लाभ...
जागृती साखर कारखान्याने सुरू केलेल्या ऊस विकास योजनेचा तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये ५० हेक्टर्सवर कारखान्याच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर २५ हेक्टर्सवर बेणे लागवड अशा ७५ हेक्टर्सवर कारखान्याच्या ऊस विकास योजनेतंर्गत लागवड झाली आहे.
पाचशे हेक्टर्सवर खोडवा...
मागील तीन- चार वर्षातील दुष्काळी परिस्थितीत जवळपास अडीच हजार हेक्टर्समधील ऊसाचे क्षेत्र मोडित निघाले होते. परंतु ज्या शेतकऱ्यांना स्वतः च्या शेतात विहीर, बोअरची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पाचशे हेक्टर्स खोडवा ऊसाची जोपासणा केली आहे. त्यामुळे नवीन २ हजार ८०० आणि खोडवा ५०० अशा एकंदर ३ हजार ३०० हेक्टर्सवर ऊस असल्याचे क्षेत्रीय अधिकारी कदम यांनी सांगितले.