अहमदपूर तालुक्यातील सावरगाव रोकडा जिल्हा परिषद गटातून सुमन रामराव सोनेवाड यांनी निवडणूक लढविली होती. निवडणूक लढतेवेळी जात पडताळणी समिती, औरंगाबाद यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्राकरिता सादर केलेल्या प्रस्तावाची पोचपावती जोडली होती. दरम्यान, त्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपूनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. याबाबत गोविंद बालाजी दगडे (उमरगा कोर्ट, ता. अहमदपूर) यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १२-अ नुसार अर्ज दाखल केला होता. राखीव जागेतून निवडणूक लढवित असताना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र न देता जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावाची फक्त पोचपावती सादर केली असल्याचे अर्जदार दगडे यांचे म्हणणे होते. याअनुषंगाने जिल्हाधिका-यांकडे सुनावणी झाली. शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीत गैरअर्जदार जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नसल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सुमन सोनेवाड यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे. शिवाय, या गटातील जि. प. सदस्यपद रिक्त घोषित केले असल्याची माहिती अर्जदार दगडे यांचे विधिज्ञ ॲड. एम. व्ही. गाडेकर यांनी दिली.
सावरगाव रोकडा गटातील सुमन सोनेवाड यांचे जि. प. सदस्यत्व अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:15 AM