लातूर : पावसाळा ऋतू असूनही उन्हाळ्यासारख्या तीव्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. जवळपास महिनाभरापासून पावसाने ताण दिला आहे. परिणामी, हलक्या व मध्यम जमिनीवरील पिके करपत आहेत. चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. एकंदरित, पावसाअभावी खरीपाच्या उत्पादनात साधारणत: ६० टक्क्यांची घट झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे.
यंदा विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्याही लांबल्या. आगामी काळात पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर खरीपाच्या पेरण्या उरकल्या. जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या झाल्या असून त्यात सोयाबीन ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टर, तूर - ६४ हजार ४६३, उडीद- २ हजार ९१९ तर मुगाचा ४ हजार ३९८ हेक्टरवर पेरा झाला आहे. जुलैमध्ये सतत रिमझिम व संततधार पाऊस झाला. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अन् तण वाढले. जुलैअखेरीसपासून पावसाने ताण दिला आहे.
सोयाबीन सध्या फुलोऱ्यात असल्याने पावसाची नितांत गरज आहे. परंतु, वरुणराजाने गुंगारा दिल्याने हलक्या, मध्यम जमिनीवरील पिके वाळू लागली आहेत. ही पिके जगविण्यासाठी काही शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३३६.२ मिमी पाऊस झाला असून १९९.६ मिमी पावसाची तूट आहे.
२७ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड...जिल्ह्यातील २१ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. त्यात लातूर, बाभळगाव, हरंगुळ, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कनेरी. बेलकुंड, किनी, उजनी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, मदनसुरी, भुतमुगळी, उदगीर, ताेंडार, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी, आष्टा, कारेपूर, हिसामाबाद, घोणसी मंडळाचा समावेश आहे.
३३ मंडळात २० दिवसांपेक्षा जास्तीचा खंड...जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळे आहेत. त्यापैकी ३२ महसूल मंडळात १५ ते २० दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी हलक्या, मध्यम जमिनीवरील पिकांच्या उत्पानात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी धास्तावला आहे.
रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षण सुरु...जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी सर्वेक्षण करीत आहेत. ३० ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. तो अहवाल शासनास पाठविण्यात येईल. त्यानंतर शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.- शिवसांब लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
पिकांबरोबर फळबागांनाही फटका...महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. पाण्याअभावी बहरलेल्या पिकांची फुलगळ, फळगळ वाढली आहे. पिके निस्तेज झाली आहेत. फळबागांचे माेठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट होणार आहे.- भागवत बिरादार, शेतकरी.