लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार, गर्भपात प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सदर प्रकरणात आरोपींना पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप केला होता़ त्यात प्रथमदर्शनी समोर आलेल्या तथ्यानुसार निलंबन कारवाईची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ शिवाजीराव राठोड यांनी केली होती.
तळेगाव येथील पीडित मुलीचे कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी परळी येथील मुकादमाच्या मार्फत तामिळनाडू येथे गेले होते़ तेथे ऊस वाहतूक करणारा चालक व पीडितेच्या कुटुंबाचा संबंध आला़ हंगाम संपल्यानंतर आरोपींने ६ एप्रिल २०१७ रोजी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने केली होती़ सदर तक्रारीनुसार आरोपी सुरेश गोविंद पवार त्याचा भाऊ एकनाथ पवार तसेच मुकादम अरूण राठोड यांच्याविरूद्ध प्रथम अपहरण व नंतर दोन महिन्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला़ सदर मुलगी गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते़ हे प्रकरण दडपण्यासाठी बळजबरीने त्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला़ या सबंध घटनाक्रमामध्ये पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मुलीच्या माता-पित्यांनी केला़ त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे तक्रार केली़ देवणी न्यायालयात धाव घेतली़ पोलीस अधिका-यावर आरोप करण्यात आल्याने महिला पोलीस अधिकारी तथा लातूर ग्रामीणच्या उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला़ तत्पूर्वी तपास अधिकाºयांनी दिलेला अहवाल, समोर मांडलेले तथ्य व पीडितेच्या पालकांचा जबाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ राठोड यांनी निलंबन कारवाईची शिफारस विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्याकडे केली़ त्यानंतर सदर कारवाई झाली़