लातूर : श्रावण महिना सुरु झाला असून, यानंतरच्या कालावधीत विविध सण, उत्सव असतात. त्यामुळे अनेकांच्या घरी हर्षोल्हासाचे वातावरण असते. सोबतच गोड पदार्थ तयार करण्यालाही गृहिणींची पसंती असते. त्यामुळे श्रावण महिन्यापासून साखरेला मागणी वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २ हजार ५०० टन साखरेची मागणी असून, मागणी तसा पुरवठा होत आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून साखरेच्या मागणीत वाढ झाली असून, प्रतिकिलो ३३ ते ३५ रुपयांचा दर आहे. जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत साखरेचा पुरवठा नियमित असल्याने दरही स्थिर असल्याचे लातूरच्या बाजारातील चित्र आहे.
जिल्ह्यात दररोज लागणारी साखर - २,५००
श्रावण महिन्यात मागणी वाढली - १००
नियमित पुरवठा असल्याने दर स्थिर...
जिल्ह्यात साखरेचा नियमित पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज जवळपास २ हजार ५०० टन साखरेची विक्री होते. आगामी काळात सण, उत्सव आहेत तसेच श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे साखरेला मागणी वाढल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामीण भागातही साखरेचा मागणीनुसार पुरवठा होतो.
- बस्वराज वळसंगे, व्यापारी
होलसेल दुकानातून किराणा साहित्याची खरेदी केली जाते. वाहतूक खर्च असल्याने साखरेची ३३ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. श्रावण महिना आणि त्यानंतर सण, उत्सव असतात. या काळात साखरेला मागणी असते. सध्याही साखरेच्या मागणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरही स्थिर असल्याचे चित्र आहे.
- अमरेश पाटील, व्यापारी
सणासुदीच्या काळात मागणी...
नागपंचमी, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी हे सण महत्त्वाचे असतात. त्यामुळे घरोघरी गाेड पदार्थ तयार केले जातात. यामुळे साखरेचा वापर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दरही स्थिर असल्याने एकदाच साखर खरेदी करुन ठेवली आहे.
- राणी ढोले, गृहिणी
श्रावण महिन्यात उपवास असतो. त्यामुळे विविध उपवासाचे पदार्थ तयार करुन ठेवले जातात. यानंतरच्या महिन्यात नवरात्र, गणेशोत्सव, ज्येष्ठागौरी, दसरा, दिवाळी सण आहेत. त्यामुळे विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे साखरेला मागणी आहे. काही दिवसांपासून साखरेच्या दरात वाढ झालेली नाही.
- रेखा शिंदे, गृहिणी
साखरेचे दर...
जानेवारी - ३३
फेब्रुवारी - ३३
मार्च - ३३
एप्रिल - ३३
मे - ३४
जून - ३४
जुलै - ३५
ऑगस्ट - ३५