लातूर : तलवार आणि एअरगन बाळणाऱ्या एका युवकाला विवेकानंद चाैक, एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिस पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविराेधात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गणेशाेत्सव काळात सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, संशयास्पद वावरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यांच्या स्तरावर पाेलिस पथकांकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाला एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत पाच नंबर चौक, बार्शी रोड परिसरात एकजण लोखंडी तलवार, एअरगन बाळगत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. याच्या आधारे पाेलिस पथकाने घरावर छापा मारला. घरातून तलवार, एअरगन जप्त करून नीलेश सत्यवान मादळे (३२, रा. पाच नंबर चौक, बार्शी रोड, लातूर) याला अटक केली.
याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक डोके करत आहेत. ही कारवाई विवेकानंद चाैक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गोरख दिवे, सहायक पोलिस निरीक्षक पल्लेवाड, संजय फुलारी, बाळू भोसले यांच्यासह विवेकानंद चौक ठाण्याच्या पथकाने केली आहे.